मोडी लिपि प्राथमिक अभ्यास महत्व व प्रस्तावना


Thursday, January 31, 2019

मोडी लिपि प्राथमिक अभ्यास महत्व व प्रस्तावना

मोडी लिपि प्राथमिक अभ्यास महत्व व  प्रस्तावना 


मागील लेखांत आपण मोडी लिपीचा उगम , विकास , इतिहास , मोडी लिपीचे खरे जनक कोण ? इत्यादी अनेक विषय अभ्यासले . अशा या आपल्या मोडी लिपी विषयी आत्ता नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मनात ती शिकण्याची ओढ निर्माण झालीच असणार . मला तरी असे वाटते की, प्रत्येकाने या आपल्या ऐतिहासिक लिपीचा अभ्यास केलाच पाहिजे . तिचे थोडे तरी ज्ञान घेतलेच पाहिजे. छपाईच्या दृष्टीने मोडी लिपीची मर्यादा सिमीत झाल्याने कालौघात ही लिपी हळूहळू मागे पडली . ती राजदरबारातूनच नव्हे तर व्यवहारी जीवनातूनही मागे पडली इतकेच नव्हे तर ती हळूहळू मोडीतच गेल्यात जमा झाली .


आजही आपण शिवकाळातील व पेशवाई काळातील कागदपत्रांवर नजर टाकल्यास त्यातील बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच आहेत हे दिसेल . तसे आजही खाजगी संस्थांकडे , शासकीय , निमशासकीय , जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय , भूमी अभिलेख कार्यालय , नगर पालिका येथील जूने दस्तऐवज मोडी लिपी मध्ये आहेत .


महाराष्ट्र शासनाच्या पुरलेखागारातील पुणे पुरालेखागाराचे  उदाहरण द्यावयाचे झाले तर या ठिकाणी पेशवा दप्तरातील १५९० पासूनचे मोडी लिपीतील अभिलेख ठेवण्यात आले आहेत.  एका लिपीतील , एका भाषेतील एका राजवटीतील व एकाच राज्याची इतिहास सांगणारी सन १५९० ते १८६५ म्हणजेच सुमारे २५० वर्षाची ऐतिहासिक मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत .


या व्यतिरिक्त मुंबई , पुणे , धुळे , इंदूर , ग्वाल्हेर , तंजावर , कर्नाटक,केरळ  इत्यादी अनेक जमीन महसूल विभाग ते सरकारी दप्तरखान्यांतून व पुरलेखागारातून कोट्यावधी कागद मोडी लिपीत लिहिलेले आहेत मात्र आज अशी स्थिति की मोडी जाणकार किंवा मोडी लिपीतील अभिलेखांचे वाचन करणारे अत्यंत अल्प असल्याने या दस्तऐवजांचे वाचन होत नाही .


कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहात नाही त्याप्रमाणे सरकारने मोडी लिपी बंद केली  असली तरी,मोडी लिपीचा काळ जरी गेलेला असला तरी जुनी कागदपत्र तर आहेतच . पण ते वाचण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी वाचक नाहीत आणि म्हणूनच कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी शिक्षणाशिवाय पर्याय नाही . कारण भाषा, लिपी व व्यवहार यांचा संबंध वेगवेगळा असला तरी मोडी लिपीचे शिक्षण घेणे हे शासकीय दप्तरातील मोडी लिपीतले कागदपत्रे पाहता आवश्यक आहे .


कारण अशा प्रकारची कागदपत्रे केवळ सरकारी कचेर्‍यांतच नव्हे तर आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या घरांत , गावोगावी देवळांत देखील उपलब्ध आहेत . गावोगावी अस्तित्वात असलेली खरेदीखत , गहाणखत , बोटखते , फारोक्तखते , करारपत्रे , दान पत्रे , वाटणी पत्रे अभयपत्रे , मृत्यूपत्रे , जाहीरनामा , राजपत्र केवळ आपल्याला वाचता येत नाहीत पण महत्वाची आहेत . त्यात काय लिहून ठेवले आहे हे कोणाला कसे समजणार हा प्रश्न सर्वांना भेडसावणारा आहे. म्हणून आपल्याला मोडीचा अभ्यास करायला हवा .


मोडी लिपीची भाषा मराठीच असते त्यामुळे मोडी लिपीचा कागद आपण मराठीत (देवनागरी) लिपीत करतो त्याला " लिप्यंतर " (Translitereation)  असे म्हणतात .त्याला भाषांतर (translation) असे म्हणायचे नाही हे लक्षात ठेवा.


सामान्यतः फारशी लिपीला " पिशाच्च " लिपी म्हणतात.  कारण ती उजवी कडून डावीकडे लिहीली जाते . परंतु मोडी लिपीलाही पूर्वी  " पिशाच्च " लिपी म्हणत असत . ते का म्हणतात हे तुम्हाला प्राथमिक (Basic) मोडी लिपीचा अभ्यास करताना समजेलच. आणि हा प्राथमिकचा (Basic) अभ्यास जसजसा प्रगत (Advance) कडे वळेल तसतशी पिशाच्च /मोडी लिपी तुम्हाला अधिकाधिक आवडू लागेल. व तिचा अधिक अभ्यास करण्याकडे तुमचा कल आणखी वाढेल .


मोडी लिपी ही इतिहासात डोकावण्याचा राजमार्ग आहे . लिपी वाचता येत असल्यास आपण इतिहासातील अनेक पुरावे आणि तत्कालीन परिस्थिति , खरेदी विक्री व्यवहार , आज्ञापत्रे सामाजिक , आर्थिक, कौटुंबिक कागदपत्रे निश्चित समजून घेऊ शकतो . असे म्हणतात जे इतिहास विसरतात त्यांना भविष्यकाळ नसतो . असा इतिहास शोधून काढायचा असेल तर मोडी लिपितील ही कागदपत्रे वाचणे अत्यंत आवश्यक आहे .


शिकण्याची आवड जरी असली तरी या साठी वेळ देणं पण महत्वाच आहे . पण यासाठी सर्वांनाच एखाद्या मोडी लिपी वर्गाला उपस्थित राहणे शक्य होत नाही . त्यामुळे घर बसल्या ज्यांना मोडी निदान प्राथमिक (basic) स्तरावर तरी लिहायला , वाचायला यावी अशा सर्वांसाठी मी हा ब्लॉग बनवला आहे . या माध्यमातून तुम्ही प्राथमिक (बेसिक) स्तरावर अभ्यास करून हळूहळू तुमचा प्रवास प्रगत कडे नक्कीच वळवाल अशी मला खात्री आहे.


ब्लॉग वरील लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा . कमेन्ट (comment  ) करा . ईमेल (email) करा . तुम्हाला आणखी काही माहिती या विषयाला अनुसरून पाहिजे असल्यास जरूर मला सांगा. मला त्या संदर्भात काही ज्ञात  असेल तर मी नक्कीच तुमच्या पर्यन्त ते पोहोचवेन . तुमच्या सोबत shareकरायला मला नक्कीच आवडेल . कारण शेवटी दिल्याने , share केल्याने ज्ञान वाढते .


ब्लॉगवरील लेखांत  मोडी जाणकारांना ,तज्ञांना  काही त्रुटी अथवा काही चुकीचे लेखन अथवा माहिती आढळल्यास त्यांना ही विनंती मला जरूर मार्गदर्शन करा .


आपणा सर्वांचे आभार ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल . व जे मोडी लिपी शिकण्यासाठी म्हणून ब्लॉग वरील लेख वाचत आहेत त्यांचे विशेष आभार.  कारण तुमच्या येण्याने , शिकण्याने मोडी लिपी जाणकारांच्या संख्येत वाढ होणार आहे . व मोडीत गेलेली मोडी अभ्यासाच्या निमित्ताने का होईना पुन्हा प्रकाशात येऊ लागतेय .


पुढील लेखांपासून आपण प्रत्यक्ष मोडी लिपीच्या प्राथमिक अभ्यासाला सुरुवात करणार आहोत . तेव्हा तुमच्या जवळ १०० ते १५० पानांची फुलस्केप वही (long notebook) , पेन , पेन्सिल व फूटपट्टी घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा .

प्राथमिक अभ्यास पाठ १ मुळाक्षर शिकण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा :-
 
https://modeelipi.blogspot.com/2019/02/modi-lipi-mulakshar-basic-alphabets-lesson-barakhadi.html

2 comments:

  1. 🙏🙏🙏🙏 👍👍👍ati utam tai

    Reply
  2. मला जर पीशाच्य लिपी संदर्भात आणखीन माहिती मिळाली तर हवी आहे

    Reply

14
SHARES

Comments

Popular posts from this blog

Learn MoDi script online

ब्रेल लिपि